नंदुरबार (प्रतिनिधी) : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) च्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांच्या वतीने मुंबई येथील मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट घेण्यात आली. यावेळी शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेत उद्भवलेल्या विविध प्रश्नांकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले.
शिक्षण संचालकांनी १४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रामुळे पदोन्नती प्रक्रियेत संभ्रम निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाशी आवश्यक समन्वय न साधता प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने संबंधित पत्राला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, तसेच पदोन्नती समितीच्या बैठकीच्या अंतिम दिनांकापर्यंत TET/CTET पात्रता प्राप्त केलेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांची ज्येष्ठता ग्राह्य धरून पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
याशिवाय विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदासाठी सुरू असलेल्या समुपदेशन प्रक्रियेतील त्रुटींकडेही मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले. गुणवत्ता यादीत स्थान मिळवूनही अनेक CTET पात्र उमेदवारांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचे पुराव्यांसह निदर्शनास आणून देण्यात आले.
पदोन्नती प्रक्रिया राबविण्याच्या दिनांकापर्यंत आवश्यक TET/CTET पात्रता प्राप्त केलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता व गुणवत्ता विचारात घेणे हेच न्याय्य ठरेल, असे शिक्षक परिषदेने स्पष्ट केले. कृत्रिम ‘कट-ऑफ’ दिनांक निश्चित करून पात्र शिक्षकांना डावलले जात असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.
यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी पदोन्नतीसंदर्भातील १८ जुलै २०२५ रोजीची अधिसूचना तसेच संबंधित सर्व बाबींची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती शिक्षक परिषदेकडून देण्यात आली.
अन्यायग्रस्त सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षक तसेच गुणवत्ता यादीत स्थान मिळूनही पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना न्याय मिळेपर्यंत शिक्षक परिषदेचा लढा सुरू राहील, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) चे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम वसंत काळे, कोकण विभागीय अध्यक्ष गणेश पोतदार आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अंकुश माळी यांचा समावेश होता. ही माहिती जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.


