नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अवैध धंदे, गंभीर गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू केलेल्या धडक मोहिमेला सातत्याने यश मिळत असून, त्यातून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई, गुन्ह्यांचा वेगाने उलगडा आणि अवैध व्यवसायांवर कठोर अंकुश यामुळे पोलीस दलाबद्दल जनतेचा विश्वास अधिक वाढत आहे.
याच धडाकेबाज कारवाईचा भाग म्हणून नवापूर पोलिसांनी सुमारे ३५ लाख २० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि कंटेनर जप्त करत मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवापूर येथील कुणाल हॉटेल परिसरात नाकाबंदी करून राजस्थान क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विविध पार्सलमध्ये लपवून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मालाची तपासणी करून तो महाराष्ट्रात प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट केल्यानंतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनात नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
यापूर्वीही जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक गंभीर गुन्ह्यांचा उलगडा, अवैध धंद्यांवर कारवाई, चोरी, दरोडे, अवैध मद्य, अमली पदार्थ तसेच इतर गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात पोलीस दलाला यश आले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी समन्वयाने काम करत असल्याने गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.
अवैध व्यवसायांना आळा घालणे, गुन्हेगारांना तातडीने अटक करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे या उद्देशाने नंदुरबार पोलीस दल सातत्याने कार्यरत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होत आहे. विशेषतः ग्रामीण व शहरी भागात सुरू असलेल्या या प्रभावी मोहिमेमुळे कायद्याचा सन्मान वाढत असून गुन्हेगारीला आळा बसण्यास मोठी मदत होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ देण्याचे आवाहन करण्यात आले असून, पोलीस व जनता यांच्या समन्वयातून नंदुरबार जिल्हा अधिक सुरक्षित आणि गुन्हेमुक्त करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने कायम ठेवला आहे.


