नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप, सोलार मोटारी, केबल, पाइप, कृषी अवजारे व इतर साहित्य चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, या प्रकारामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. कष्टाने उभी केलेली शेती आणि त्यासाठी घेतलेली साधनसामग्री चोरट्यांच्या निशाण्यावर आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली शिवारातील शेतकरी नथ्थू यादव पाटील यांनी शनिवारी तालुका पोलीस स्टेशन गाठून आपल्या शेतातून चोरीस गेलेल्या साहित्याबाबत तक्रार अर्ज सादर केला. त्यांनी पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तक्रारीनुसार, दि. २५ जून २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील सुमारे ६० ते ६५ हजार रुपये किंमतीची ५ हॉर्सपॉवरची ड्युक कंपनीची सोलार मोटार, पंप व केबल चोरी करून नेली. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांच्या शेतातून सुप्रीम कंपनीचे पाइप, ऑइल इंजिन मशीन, ट्रॅक्टरच्या कल्टीव्हेटरचे पार्ट्स, सीसीटीव्ही कॅमेरे आदी मिळून सुमारे ५० ते ५५ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले होते. त्याबाबत तक्रार करूनही अद्याप चोरीचा मुद्देमाल मिळालेला नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वयोवृद्ध शेतकरी असलेल्या नथ्थू पाटील यांनी, “शेती हेच आमच्या कुटुंबाचे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. वारंवार होणाऱ्या चोरीमुळे आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहोत,” अशी व्यथा व्यक्त केली.
दरम्यान, जिल्हाभरातील अनेक शेतकरीही अशाच प्रकारच्या घटनांमुळे चिंतेत असून, रात्रीच्या वेळी शेतात ठेवलेले पंप, सोलार यंत्रणा, केबल आणि कृषी साहित्य सुरक्षित राहील की नाही, याची सतत धास्ती त्यांना लागून राहिली आहे.
नंदुरबार जिल्हा पोलिसांनी घरफोडी, गंभीर गुन्हे आणि अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. त्यामुळेच आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालमत्तेच्या चोरीच्या घटनांनाही तितक्याच गांभीर्याने हाताळून चोरट्यांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकरी व नागरिकांनी ग्रामीण भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, गावागावातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत, ग्रामसुरक्षा दल व नागरिक यांच्याशी समन्वय साधून विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला मोल आहे. त्यांच्या कष्टाने उभ्याराहिलेल्या शेतीतील साधनसामग्रीचे संरक्षण करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील वाढत्या चोरींना वेळीच आळा बसला, तर हजारो शेतकऱ्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल आणि त्यांच्या कष्टाच्या कमाईचे संरक्षण होईल.


