मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) :
राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.
प्रारूप अधिसूचनेवर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्याची संधी असेल. प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
या प्रक्रियेनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची दिशा निश्चित होणार असून अनेक जिल्ह्यांतून राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.


