विद्यार्थी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय; जि.प.चे माजी सदस्य तथा माजी सभापती रतन के. पाडवी यांचे विभाग नियंत्रकांना निवेदन
धडगाव : धडगाव तालुक्यातील सोमाणा, मुंदलवड, खर्डी, वरखेडी, खुटामोडी, सुरवाणी, मोजरा, खांडबारा, हरणपुरी व भुजगाव या गावांना जोडणाऱ्या मार्गावर नियमित एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांसह शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य प्रवाशांना दैनंदिन प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या मार्गावर नियमित एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा माजी सभापती रतन के. पाडवी यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, शहादा विभागाच्या विभाग नियंत्रकांना १७ सप्टेंबर २०२६ रोजी जावक क्र. ४०/२०२६ अन्वये निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सोमाणा, मुंदलवड, खर्डी, वरखेडी व खुटामोडी या मार्गावर सध्या नियमित एसटी बससेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या मार्गावरील शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी तसेच इतर प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करीत असल्याने सार्वजनिक वाहतुकीची नियमित सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे पाडवी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सकाळी ९ वाजता बस सुरू करण्याची मागणी
प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी ९ वाजता धडगाव येथून बस सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित मार्ग धडगाव – भुजगाव – सुरवाणी – मोजरा – खांडबारा – खुटामोडी – वरखेडी – खर्डी – मुंदलवड – सोमाणा – हरणपुरी असा राहणार आहे.
सायंकाळी ५ वाजता परतीची बस
तसेच सायंकाळी ५ वाजता परतीची बस सुरू करण्याची मागणी असून, तिचा प्रस्तावित मार्ग धडगाव – हरणपुरी – सोमाणा – मुंदलवड – खर्डी – वरखेडी – खुटामोडी – खांडबारा – मोजरा – सुरवाणी – भुजगाव असा देण्यात आला आहे.
या मार्गावर एसटी बससेवा सुरू झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, वेळेवर आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. विशेषतः विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालयातील ये-जा, शेतकऱ्यांचा बाजारपेठेतील प्रवास तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांची दैनंदिन कामांसाठी होणारी ये-जा सुलभ होणार आहे.
त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने या मार्गावर नियमित बससेवा सुरू करावी, अशी मागणी माजी जि.प. सदस्य तथा माजी सभापती रतन के. पाडवी यांनी केली आहे.
एसटी महामंडळाच्या निर्णयाकडे धडगाव तालुक्यातील संबंधित गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


