नंदुरबार (प्रतिनिधी) शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता, शिक्षणप्रेम आणि लोककल्याणकारी कार्याची तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय शौर्य, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि बलिदानाची माहिती देण्यात आली. महापुरुषांचे विचार आणि कार्य हे आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असून त्यांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव श्री. गणेश गोविंद पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले. सामाजिक समतेचे मूल्य, राष्ट्रप्रेम, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून समाजहितासाठी कार्य करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.


