शहादा : भाजपा महिला मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा मा. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली.
यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, नंदुरबार डॉ. समिधा नटावदकर यांच्या उपस्थितीत महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. चित्राताई वाघ यांनी महिला मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ व बूथ पातळीवर महिला कार्यकर्त्यांचे सक्षम संघटन उभे करणे, अधिकाधिक महिलांना संघटनेशी जोडणे, नव्या महिला नेतृत्वाला संधी देणे तसेच शासनाच्या विविध महिला कल्याणकारी योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी चित्राताई वाघ यांनी उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या सूचना, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.
या बैठकीस प्रदेश पदाधिकारी जयश्री अहिरराव, गीता गिल्डा, सुरेखा पाटील, शहादा नगरपालिका उपनगराध्यक्ष माधवी पाटील, जयश्री पाटील, सविता जयस्वाल, ॲड. उमा चौधरी, सरचिटणीस नेहा पाडवी, शीतल चौधरी, आशा पाडवी, नीला मेहता, सानू वळवी, डॉ. सपना अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने मंडळ अध्यक्ष, महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. बैठकीचे सूत्रसंचालन पद्मा परदेशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन माधवी पाटील यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे बैठक उत्साहपूर्ण आणि यशस्वीपणे पार पडली.
महिला मोर्चाच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि आगामी काळातील कार्याची दिशा निश्चित करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.


