नंदुरबार (प्रतिनिधी) शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला झोकून देत अनेक अडथळ्यांवर मात करुन विद्यार्थिनींना शिक्षण क्षेत्रात उभं करुन त्यांच्यात नवं चैतन्य निर्माण करुन एक आदर्श निर्माण करणाऱ्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती रामचंद्र लष्करी यांना अहिल्यारत्न म्हणुन गौरव करण्यात आला.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या समर्पित सेवेचा गौरव करण्यात आला. अक्कलकुवा या आदिवासी बहुल क्षेत्रातील रहिवासी असलेल्या डॉ ज्योती लष्करी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले व सोबतच लहान भाऊ बहिणी यांचे देखील शिक्षण पूर्ण केले. डॉ. ज्योती लष्करी यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे डॉ. कविता साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एच.डी. पूर्ण केली. डॉ. ज्योती लष्करी या सध्या रुरल फाउंडेशन नंदुरबार संचलित शिक्षण शास्त्र महिला महाविद्यालयात गेल्या 10 वर्षां पासुन प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. आदिवासी व ग्रामीण भागात काम करतांना अनेक अडचणींवर मात करुन त्या आत्मनियतेने काम करीत आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन कराड येथील अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्था यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रविण काकडे, माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते डॉ. ज्योती यांना अहिल्यादेवी होळकर अहिल्यारत्न म्हणुन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, विद्यार्थी व महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. डॉ. ज्योती यांच्या गौरवा मुळे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सवित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या पटेल यांनी अभिनंदन केले आहे.