नंदुरबार (प्रतिनिधी)
शिवण नदीवरील बहुप्रतिक्षित बिलाडी धरण प्रकल्प अखेर मार्गी लागत असून, या प्रकल्पाला गती देण्याचे श्रेय माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला जाते, असे प्रतिपादन त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी खासदार डॉ. हिना गावित उपस्थित होत्या.
डॉ. गावित यांनी सांगितले की, १९९९ साली तत्कालीन मंत्री म्हणून त्यांनीच या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर २००८ मध्ये प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली व भूमिपूजनही झाले. मात्र शेतकरी मोबदला आणि खामगाव गाव बुडीत जाण्याच्या भीतीमुळे हा प्रकल्प तब्बल दीड दशक रखडला होता. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी शासन, प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधत मध्यम मार्ग काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुनर्वसनाऐवजी धरणाची उंची कमी करून खामगावसाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्या भिंतीचे काम सध्या सुरू आहे. यामुळे पुनर्वसन टाळले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रकल्पाचा तांत्रिक तपशील व लाभ
डॉ. गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील बिलाडी गावाजवळ शिवण नदीवर उभारण्यात येणारा हा माती धरण प्रकल्प असून,
पाणी साठवण क्षमता : ३.७२ दशलक्ष घनमीटर
सिंचन क्षेत्र : सुमारे ८३० ते १८३० हेक्टर शेती
धरण भिंत : २०७ मीटर लांब, पूर्णपणे कॉक्रीटीकरण; चार वक्राकार गेट
बजेट : २०२४ मध्ये ११३ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता
या प्रकल्पामुळे विरचक धरणातील ओव्हरफ्लो पाणी गुजरातमध्ये न जाता नंदुरबार जिल्ह्यात अडवले जाणार, त्यामुळे जलसंधारण होऊन स्थानिक शेतीला मोठा फायदा होणार आहे.
कामाला सुरुवात, २–३ वर्षांत पूर्णत्व
खामगाव शाळेजवळ खोदकाम सुरू असून, मोठ्या मशिनरीचा वापर केला जात आहे. उर्वरित जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्प पुढील २ ते ३ वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आदिवासी भागासाठी जलसुरक्षा
नंदुरबारसारख्या आदिवासी भागात जलसुरक्षा व शेती विकासासाठी धरण प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे धोरण असल्याचे सांगत, डॉ. गावित यांनी हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
खासदार डॉ. हिना गावित यांनीही प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. पत्रकार परिषदेत प्रकल्पामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मिळणाऱ्या दीर्घकालीन फायद्यांवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला.


