नंदुरबार (प्रतिनिधी) शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय संविधान दिन मोठ्या उत्साहात, अनुशासनबद्ध वातावरणात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. संविधान दिनाचे औचित्य साधत उपस्थितांनी प्रास्ताविक वाचनातून संविधानाबद्दल आदर व्यक्त केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधानाचे महत्व, त्यातील मूलभूत हक्क व कर्तव्ये आणि नागरिक म्हणून प्रत्येकाने पाळावयाच्या मूल्यांवर सखोल प्रकाश टाकला. “संविधान हा देशाच्या विकासाचा भक्कम पाया असून त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले. युवा वर्गाने संविधानातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना दैनंदिन जीवनात आणण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कल्याणी चौधरी आणि प्रा. जागृती शेवाळे, प्रा. भावना वसावे, प्रा. पूजा गायकवाड तसेच प्रा. श्रद्धा पटेल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जागृती शेवाळे यांनी उत्तमप्रकारे सांभाळले.
संविधान दिन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. योगिता पाटील, सचिव गणेश पाटील आणि प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त भरलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांची जाणीव अधिक दृढ करणारा ठरला.


