नंदुरबार | प्रतिनिधी
नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (शिंदे गट)चे वरिष्ठ नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय परिस्थिती, युतीचे प्रयत्न, उमेदवारांची स्थिती आणि आगामी रणनिती स्पष्टपणे मांडली. महायुतीने दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर युतीसाठी प्रयत्न झाले असले तरी काही ठिकाणी ते शक्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
नंदुरबार आणि तळोदा — धनुष्यबाणवर पूर्ण पॅनल उभा
रघुवंशी यांनी स्पष्ट केले की नंदुरबार आणि तळोदा या दोन्ही नगरपालिकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर पूर्ण पॅनलसह निवडणूक लढवत आहे. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे चार उमेदवारही या पॅनलमध्ये सहभागी असून, तेही धनुष्यबाणवरच निवडणूक लढवणार आहेत.
नवापूरमध्ये चार शिवसैनिक राष्ट्रवादीच्या चिन्हावर
प्रतिसादात्मक धोरणांतर्गत नवापूर नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदे गट) चार उमेदवार राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या चिन्हावर लढणार असल्याची माहिती देण्यात आली.
शहादा नगरपालिका — आघाडी आणि शिवसेना एकत्र
शहाद्यामध्ये सहा उमेदवार अभिजीत पाटील यांच्या आघाडीच्या चिन्हावर उभे केले असून, दोन उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाणवर लढणार आहेत.
“आमचा एकच नेता — मुख्यमंत्री एकनाथ शिंदे” – आ रघुवंशी
संपूर्ण पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आमचे सर्वांचे एकमेव नेता असल्याचे ठामपणे सांगण्यात आले. मा आ शिरीषदादा चौधरी यांच्या सोबतचे अनेक नगरसेवकांचा काल शिंदे गटात झालेला प्रवेश औपचारिकरित्या पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार प्रतिनिधींच्या कुटुंबियांनाही उमेदवारी
पत्रकारांबाबत निर्माण झालेला गैरसमज दूर करताना, पत्रकार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विशाल माळी यांच्या पत्नीला शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी जाहिर केले.
छाननी प्रक्रियेसाठी वकिलांची फौज सज्ज
छाननीत कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना “मर्दासारखी निवडणूक लढा, हरकती घेऊ नका” अशा सूचना देण्यात आल्या. तरी विरोधकांनी हरकती घेतल्यास आमची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील अॅड प्रशांत चौधरी, अॅड बंडू जोशी तसेच संभाजीनगर येथून अॅड ज्ञानेश्वर बागुल यांच्यासह तज्ञ वकिलांना बोलावण्यात आले आहे.
“भाजपमध्ये गोंधळ; अनेकांनी फॉर्मच भरले नाही” आ रघुवंशी
पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधताना, शहराध्यक्षांसह अनेकांनी उमेदवारी अर्जच न भरल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या एका घटाने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवस निवडणूक प्रचारापासून दूर
तब्येत बरी नसल्याने उपचारासाठी मुंबईला जाणे आवश्यक असल्याने पुढील काही दिवस निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणांगणापासून दूर राहावे लागेल, अशी माहिती आ रघुवंशी यांनी दिली.
तळोदा — शिवसेनेकडून जोरदार मुकाबला; जितेंद्र क्षत्रिय नगराध्यक्षपदाचे उमेदवार
तळोदा नगरपालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र क्षत्रिय यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनल अटीतटीची लढत देण्यास सज्ज असल्याचे सांगण्यात आले.
अलीकडच्या उमेदवारी मिरवणुकीत शिवसेनेचा दमदार उत्साह दिसून आल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या निवडणूक चित्रावर स्पष्ट भूमिका मांडत शिवसेनेने स्वतःची राजकीय ताकद दाखवून दिली. निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते प्रचंड जोमाने लढतील, असा ठाम विश्वास आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.


