बामडोद (ता. नंदुरबार) | दिनांक 4 नोव्हेंबर 2025 – शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे “अविष्कार २०२६” या शैक्षणिक आणि संशोधनाधिष्ठित प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण २८ विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपले नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या दिशेने पाऊल टाकून नवसंकल्पना विकसित कराव्यात आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा, यासाठी “अविष्कार”सारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून श्री. भुषण टी. गोपाळ यांनी तर महिला समन्वयक म्हणून सौ. ताश्विता पी. मगरे यांनी कार्यभार सांभाळला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे परीक्षण ज्यूरी सदस्य श्री. रोहित एन. पाटील आणि सौ. कल्याणी डी. जावरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी औषधनिर्मिती, वैद्यकीय विज्ञान, शुद्ध विज्ञान, जैव तंत्रज्ञान, पर्यावरण व आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रांवर आधारित संशोधनात्मक प्रकल्प सादर केले.
स्पर्धेच्या निकालात मेडिसिनल अँड फार्मसी विभागात
➡️ कावेरी किशोर पावरा – प्रथम क्रमांक
➡️ हेमांगी किशोर सोनवणे – द्वितीय क्रमांक
तर शुद्ध विज्ञान विभागात
➡️ अंकित विजय सोनवणे – प्रथम क्रमांक
➡️ यशराज योगेश परमार – द्वितीय क्रमांक
परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामधील संशोधन दृष्टिकोन, विषयातील अचूकता, समाजोपयोगी विचार आणि प्रकल्पांची भविष्यातील व्यावहारिकता यांचे विशेष कौतुक केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची दिशा, सादरीकरण कौशल्य, तांत्रिक माहिती संकलन आणि वैज्ञानिक विवेचनाचा मौल्यवान अनुभव मिळाल्याचे प्राचार्य डॉ. चौधरी यांनी सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. योगिता गणेश पाटील, सचिव श्री. गणेश गोविंद पाटील तसेच प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी कार्यक्रमातील सर्व विद्यार्थ्यांचे आणि आयोजन समितीचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, तांत्रिक कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक आणि समन्वयक मंडळींनी मोठे परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सूत्रसंचालनातून सादर झालेला हा कार्यक्रम अत्यंत आकर्षक आणि अनुकरणीय ठरला.
“अविष्कार २०२६” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना देणारा ठरला असून पुढील वर्षांमध्ये हा उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबवण्याचा संकल्प महाविद्यालयाने व्यक्त केला आहे.


