नंदुरबार (प्रतिनिधी)
नंदुरबार तालुक्यातील शनिमाडळ, तिलाली, तलवाडे आणि रनाळे परिसरातील शेकडो शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून मोठी राजकीय घडामोड घडवून आणली आहे. महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या विकासदृष्टी आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार डॉ. गावित, माजी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील तसेच जिल्हा परिषदेचे शनिमाडळ गटाचे माजी सदस्य प्रवीण पाटील उर्फ मुन्नादादा प्रमुख उपस्थितीत पार पडला.
भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये तिलाली गावचे माजी सरपंच व एनटीव्हीएस संस्थेचे माजी संचालक संतोष उत्तम पाटील, माजी सरपंच पितांबर सावंत, लोटन पाटील, रघुनाथ पाटील, पप्पु शिरसाठ, साहेबराव पाटील, साहेबराव ठेलारी, राजु ठेलारी, देवराम ठेलारी, आत्माराम सावंत, निलेश माळी, नाना श्रीराम पाटील, शांतीलाल पाटील, बाळू पाटील, आबा व्यंकट पाटील, भगवान डीगंबर पाटील, राजेंद्र पाटील, वासुदेव माळी, शेखर पाटील, इलियास खाटीक, जयेश गोरख पाटील, निलेश विष्णू पाटील, योगेश पाटील, कुणाल पाटील, सुरेश चैत्राम पाटील, सचिन कोळी, रावसाहेब पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मगरे, उपसरपंच उत्तम गुलचंद भिल, माजी उपसरपंच छोटू भिल, भैया कोळी, गोविंदा पाटील, हर्षल पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक युवराज पाटील आदींचा समावेश आहे.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण (मुन्ना) पाटील, सागर तांबोळी, तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेश सोहळ्याचे नियोजन आणि समन्वयाचे परिश्रम जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण पाटील (मुन्ना दादा) यांनी घेतले असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
भाजपात डॉ. हीना गावित यांचे अलीकडील पुनरागमन झाल्यापासून पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला नवे बळ मिळाले आहे. त्याचबरोबर अक्कलकुवा मतदारसंघानंतर नंदुरबार तालुक्यातीलही शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल होत असल्याने, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणात नवे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
पक्षप्रवेश कार्यक्रम शांततेत आणि आचारसंहितेचे पालन करून पार पडला असून, कार्यकर्त्यांनी विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.


