नंदुरबार (प्रतिनिधी) प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि नंदुरबार तालुका विधायक समिती यांच्या सहकार्याने बटेसिंगभैया रघुवंशी विधी महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार येथे दिनांक २६ सप्टेंबर रोजी पार पडले.
शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. पी. एन. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संघटित होणे व कायद्याचे ज्ञान मिळवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. बदलत्या कौटुंबिक परिस्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
दुसऱ्या सत्रात धुळे विधी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वैभव सबनीस यांनी ज्येष्ठांनी स्वतःला वयोवृद्ध समजून खचून न जाता आनंदी राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. गाणे, नृत्य, छंद जोपासणे अशा उपक्रमांमुळे जीवन समृद्ध राहते, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
तिसऱ्या सत्रात विद्यापीठाच्या विधी विभागाचे सहाय्यक अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय बहिरम यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध कायद्यांबाबत माहिती दिली. शासन स्तरावर उपलब्ध होणाऱ्या सहाय्याच्या योजनांची माहिती देत कायद्याच्या माध्यमातून हक्कांची जाणीव करून दिली.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. बारकू पाटील यांनी सध्याच्या समस्यांबाबत मांडणी केली व त्यावर उपाययोजनांचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वरिष्ठ महाविद्यालयीन समन्वयक व माजी प्राचार्य डॉ. एम. एस. रघुवंशी यांनी भूषविले. त्यांनी अशा जागरूकता उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एन. डी. चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर समन्वयक प्रा. डॉ. एस. एस. हसानी यांनी नियोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष एलएलबी विद्यार्थी हर्षल शिंदे यांनी केले. या शिबिरास ७० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.


