नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार येथील जी.टी.पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या एककाचे उद्घाटन लोकमत वृत्तसमूह नंदुरबार जिल्हयाचे उपसंपादक मनोज शेलार यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.एम.जे. रघुवंशी होते.
या प्रसंगी उपसंपादक मनोज शेलार यांनी राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी एककाच्या माध्यमातून स्वतःमध्ये चांगले संस्कार रुजवून, सुसंस्कारित समाज निर्मितीत योगदान देण्याचे आवाहन करताना एक चांगला नागरिक बनून महाविद्यालयाचे तसेच जिल्ह्याचे नाव लौकिक करणे, हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजनेची फलश्रुती आहे, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य.डॉ.एम.जे.रघुवंशी यांनी स्वयंसेवकांना शिस्त, परिश्रम आणि संघर्ष या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. मोबाईलच्या आहारी न जाता आपल्या ध्येयप्राप्तीच्या दिशेने लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देताना, ‘राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा तुमच्यासाठी समाजसेवेचे व देशसेवेचे धडे शिकण्याचा मंच आहे. नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्व विकासाची संधी एनएसएसमधून मिळते’ असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक प्रा.डॉ.एम.एस.रघुवंशी, समुपदेशक हरपाल जाधव, उपप्राचार्य डॉ.एस.पी.पाटील, डॉ.माधव कदम, डॉ.दिनेश देवरे, डॉ.विजय चौधरी, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.सुलतान पवार यांनी केले. सूत्रसंचालन सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.जितेंद्र पाटील तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी डॉ.मनोज शेवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनसाठी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.संगीता पिंपरे, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.माधव वाघमारे, प्रा शुभांगी दुतोंडे, प्रा चंद्रकांत गिरासे प्रा हर्षबोध बैसाने यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


