बामदोड/नंदुरबार (प्रतिनिधी) – राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह २०२५ च्या अनुषंगाने शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे तिसऱ्या दिवशी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “औषधांच्या दुष्परिणामांची नोंदणी : एक सामाजिक जबाबदारी” या विषयावर झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या विचारांची मांडणी केली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना फार्माकोव्हिजिलन्सचे सामाजिक तसेच व्यावसायिक महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा गायकवाड यांनी केले.
निबंधांचे मूल्यमापन परीक्षक प्रा. कल्याणी चौधरी, प्रा. जागृती शेवाळे आणि प्रा. भूषण गोपाळ यांनी केले. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार असून विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे प्रदान करण्यात येतील.
या उपक्रमाच्या आयोजनात फार्माकोव्हिजिलन्स सेल व विद्यार्थी विकास समितीचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. भावना वसावे व प्रा. रोहिणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
विद्यार्थ्यांना या स्पर्धेमुळे केवळ लेखन व विचार मांडण्याची संधी मिळाली नाही, तर औषधांच्या सुरक्षित वापराबद्दल सजगता निर्माण होऊन भविष्यात जबाबदार फार्मासिस्ट म्हणून कार्य करण्याची प्रेरणा मिळाली, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या शैक्षणिक उपक्रमाचे संस्थेच्या अध्यक्ष सौ. योगिता गणेश पाटील, सचिव श्री. गणेश गोविंद पाटील तसेच प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी विशेष कौतुक केले.


