नंदुरबार, प्रतिनिधी : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन माजी आदिवासी विकास मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. कोठली खुर्द येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना आ. डॉ. गावित म्हणाले की, “केवळ बक्षीस मिळविण्यासाठी काम न करता शाश्वत विकासावर भर द्यावा. सर्व योजनांचे पारदर्शकपणे अभिसरण करून शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचवावा. कोठली खुर्द गावाने राज्यस्तरीय बक्षीस मिळवून आपल्या गावाचा गौरव करावा.”
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, माजी जि.प. अध्यक्षा डॉ. कुमोदिनी गावित, डॉ. सुप्रिया गावित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर, गटविकास अधिकारी अनिल बिराडे, माजी जि.प. सदस्य राजश्री गावीत यांसह ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुप्रिया गावित यांनी ग्रामस्थांनी रोजगार हमी योजना, पंतप्रधान आवास योजना, वृक्ष लागवड यांसह विविध योजनांचा लाभ घेऊन गावाच्या विकासात योगदान द्यावे. महिलांनी बचत गटांद्वारे लघुउद्योग सुरू करावेत, अशी सूचना केली.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी यांनी ग्रामस्थांनी सात सूत्रांच्या कार्यक्रमावर काम करत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन विकसित करावे. जलसमृद्ध, स्वच्छ आणि हरित गाव निर्माण करणे, तसेच सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून स्वच्छतेची शाश्वतता राखावी, असे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी पुढे सांगितले की, “पुढील 100 दिवसांत विविध उपक्रम राबवून कोठली खुर्द गावाने हिवरे बाजार व राळेगणसिद्धी यांसारख्या आदर्श गावांप्रमाणे महाराष्ट्राच्या नकाशावर नाव कोरण्याची संधी आहे. जिल्हा परिषद ग्रामस्थांसोबत आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास पवार यांनी केले. यावेळी सरपंच महेंद्र वळवी, उपसरपंच जगदीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विष्णु जोंधळे यांनी केले.
या कार्यक्रमातून कोठली खुर्द गावाचा समृद्ध व शाश्वत विकास साधण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा संकल्प करण्यात आला.