नूतन कार्यकारिणी जाहीर; कुंदन पाटील कार्याध्यक्ष, चंद्रकांत पाटील सचिव तर दिनेश साळुंखे जिल्हा प्रवक्ता
नंदुरबार : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे विविध प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील बदल आणि संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा देण्यासाठी नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. यशवंत विद्यालय, नंदुरबार येथे झालेल्या कौन्सिल सदस्यांच्या बैठकीत पुढील पाच वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी, कार्याध्यक्षपदी कुंदन पाटील तर सचिवपदी चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली.
संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस माजी विभागीय अध्यक्ष सुनील भामरे (नवापूर), सल्लागार निमेष सूर्यवंशी (तळोदा) व जयदेव पाटील (शहादा) यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत संघाच्या आगामी वाटचालीसह मुख्याध्यापकांच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय व संघटनात्मक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मुकेश पाटील, सुनील भामरे, कुंदन पाटील, पुष्पेंद्र रघुवंशी, मुख्याध्यापक अंबालाल पाटील तसेच दिनेश साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. चर्चेनंतर जिल्ह्यातील सर्व कौन्सिल सदस्यांच्या सहमतीने नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी विनय गावित, अंबालाल पाटील (नवापूर), फैयाज खान, मनोहर साळुंखे (नंदुरबार), रफिक जहागीरदार (अक्कलकुवा), कालिदास पाठक (धडगाव), जगदीश पाटील, किरण पाटील (शहादा) व योगेश पाटील (तळोदा) यांची निवड झाली.
सहसचिवपदी निंबा माळी (नंदुरबार), विद्या सचिवपदी सुधाकर सैंदाणे (शहादा), सहविद्या सचिवपदी अजीम शेख (नवापूर), कोषाध्यक्षपदी संजय कुमार जाधव (नवापूर), सहकोषाध्यक्षपदी राकेश जोशी (शहादा), संपादकपदी सुनील परदेशी (तळोदा), ऑडिटरपदी दिनेश बिरारीस (नवापूर), सहसंपादकपदी सुभाष राहसे (धडगाव) तर महिला प्रतिनिधीपदी संध्या पटेल यांची निवड करण्यात आली. जिल्हा प्रवक्तापदी दिनेश साळुंखे यांची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील बदलांशी समन्वय साधून मुख्याध्यापकांच्या हितासाठी संघाची वाटचाल अधिक सक्षम करण्याचा निर्धार नवनियुक्त अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी व कार्यकारिणीने व्यक्त केला.
बैठकीस जिल्ह्यातील सर्व कौन्सिल सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


