सेवा संकल्प अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना
नंदुरबार (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी नंदुरबार तालुक्यातील दुधाळे येथे भेट देऊन सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्राची पाहणी करून अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश श्री. गोयल यांनी दिले. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा आणि अंगणवाडी परिसरातील स्वच्छतेची पाहणी करत त्यांनी अभियानांतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच, उर्वरित उपक्रम निर्धारित वेळेत पूर्ण करून अभियान यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांना योग व आरोग्याचे महत्त्व पटवून दिले
जिल्हा परिषद शाळा, दुधाळे येथील विद्यार्थ्यांनी यावेळी योगध्यानाचे प्रात्यक्षिक सादर केले. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व, आरोग्यदायी सवयी आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर त्यांनी अंगणवाडी केंद्राला भेट देऊन बालकांचे प्राथमिक शिक्षण, पोषण आहार, खेळ आणि वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, पोषण आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे महत्त्वही या भेटीत अधोरेखित झाले.
यावेळी ग्रामपंचायत दुधाळे येथील अधिकारी व पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होते.


