नंदुरबार : महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण शांतिलाल साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यातील त्यांचे योगदान आणि रुग्णसेवा क्षेत्रातील सक्रिय सहभागाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोटकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्य नागरिक तसेच श्रमिक कामगारांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या उद्देशाने साळुंखे यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेची शिस्त, नियम व उद्दिष्टांचे पालन करत निष्ठेने कार्य करावे, तसेच गरजू रुग्ण आणि श्रमिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरांशी समन्वय साधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
नियुक्तीनंतर अरुण साळुंखे यांचे विविध सामाजिक, राजकीय, रुग्णसेवा तसेच कामगार क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे नंदुरबार तालुक्यातील रुग्णसेवा अधिक सक्षम होण्यासह श्रमिक कामगारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीला चालना मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.


